नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

नाशिक। दि. २९ मार्च २०२६: केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ सन 2022-23 ते 2026-27 अंतर्गत जिल्ह्यात रविवार 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळत पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन व संख्याज्ञान) मूल्यमापण चाचणी (FLANT) परीक्षा होणार आहे. नोंदणी झालेल्या असाक्षर व्यक्तींनी परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षाणाधिकारी (योजना) सरोज जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये मूलभूत साक्षरता (वाचन, लेखन व संख्याज्ञान) विकसित करण्याबरोबरच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली असून, दिनांक 25 जानेवारी 2023 च्या निर्णयानुसार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या अभियानामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागरूकता, बाल संगोपन व शिक्षण, कुटुंब कल्याण आदी घटकांचा समावेश असून, असाक्षर व्यक्तींना स्वावलंबी व सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. तसेच स्थानिक रोजगार, पुनर्कौशल्य व उच्च कौशल्ये विकसित करण्यासाठीही हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 15 तालुके तसेच मालेगाव व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 1 हजार 474 केंद्रांवर 11 हजार 349 परीक्षार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. ही परीक्षा 150 गुणांची असून ती परीक्षार्थ्यांच्या सोयीने व वेळेनुसार पार पडणार आहे. या परीक्षेस यापूर्वी नोंदणी झालेली परंतु परीक्षेला अनुपस्थित राहिलेले असाक्षर व्यक्ती, परीक्षा दिलेले परंतु सुधारणा आवश्यक (Need Improvement) असा शेरा प्राप्त असलेले असाक्षर, सन 2025-26 मध्ये उल्लास मोबाईल ॲपवर नव्याने नोंदणी झालेले असाक्षर प्रविष्ट होतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती जगताप यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790