SIR: चार दिवसांत शंभर टक्के डिजिटायझेशनचे उद्दिष्ट साध्य करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. २१ जुलै २०२६: भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार गणना अर्जांचे वितरण, संकलन, डिजिटायझेशन, फोटो सिमिलर एन्ट्रीज (PSE) पडताळणी आणि मतदार यादी शुद्धीकरणाची सर्व कामे पुढील चार दिवसांत मिशन मोडमध्ये शंभर टक्के पूर्ण करावीत. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक व संबंधित अधिकारी यांनी अचूकता, गती आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत नियोजित वेळेपूर्वी काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात गणना अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू होती. मात्र, काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे या मोहिमेत व्यत्यय निर्माण झाल्याने भारत निवडणूक आयोगाने १५ जुलै २०२६ रोजीच्या पत्रान्वये सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.

या सुधारित कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी १८ जुलै रोजी नाशिक शहरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बीएलओंसमवेत गृहभेटी देऊन तसेच मतदान केंद्रांवरील व विधानसभा स्तरावरील डिजिटायझेशनच्या कामाचा आढावा घेतला आहे.. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125-नाशिक पश्चिम व 126-देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व बीएलओ पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अमित रंजन, महानगरपालिका नाशिकचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : तीन लाखांचे दोन लॅपटॉप असलेली बॅग अवघ्या दोन तासांत परत; सरकारवाडा पोलिसांची तत्परता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गणना अर्जांचे वितरण, संकलन आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया पुढील चार दिवसांत शंभर टक्के पूर्ण करावी प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांच्या कामाचा भागनिहाय आढावा घेऊन उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राजकीय पक्षांच्या कार्यालयात बसून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गणना अर्जांचे वितरण करू नये. गणना अर्ज केवळ बीएलओ किंवा त्यांच्या सहाय्यकांकडेच राहावेत. इतर कोणत्याही व्यक्तीकडे ते देऊ नयेत. अर्ज स्वच्छ व स्पष्ट अक्षरात भरल्यास त्रुटी कमी होतील. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने डिजिटायझेशनसाठी इंटरनेट सुविधा असलेल्या शाळा, महाविद्यालये किंवा सायबर कॅफे अधिग्रहित करून तीन शिफ्टमध्ये अधिकारी-कर्मचारी नियुक्त करावेत, जेणेकरून काम मुदतीत पूर्ण होईल, Photo Similar Entries (PSE) अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, विविध राजकीय पक्षांकडून डुप्लिकेट मतदारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संशयित नोंदीची काटेकोर पडताळणी करावी. डुप्लिकेट नावे आढळल्यास संबंधित नोंदीसमोर “Already enrolled at AC/Part/Sl. Number” अशी नोंद करावी. पीएसईचा भागनिहाय दररोज आढावा घेऊन हे कामही पुढील चार दिवसांत पूर्ण करावे.

मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्यास (Absent), स्थलांतरित झाल्यास (Shifted) किंवा मयत असल्यास (Death) अशा मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून महानगरपालिकेकडून मृत्यू दाखले प्राप्त करावेत. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार मतदार यादीतून नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. गणना अर्जासोबत मतदारांच्या आधारकार्डाच्या प्रती घेऊ नयेत. केवळ आधार क्रमांक अचूक नोंदवावा. बीएलओ अॅपमध्ये फोटो घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याने मतदारांकडून स्वतंत्र फोटो जमा करण्याची सक्ती करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. फिल्डवर बीएलओ किंवा सहाय्यक बीएलओ उपस्थित नसल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. प्रसाद त्यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत ऑटोरिक्षासाठी सुधारित भाडेदर लागू; जाणून घ्या सविस्तर…

राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बीएलए (BLA) यांची बैठक घेऊन मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. मतदारांचा पत्ता शोधण्यासाठी त्यांनी बीएलओंना सहकार्य करावे, अशा सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ पर्यवेक्षक यांनी बीएलओ अॅपची संपूर्ण माहिती आत्मसात करून किमान पाच गणना अर्ज स्वतः डिजिटाईज करून पाहावेत. प्रत्येक मतदारसंघात दररोज जमा होणाऱ्या सर्व गणना अर्जांचे त्याच दिवशी डिजिटायझेशन पूर्ण करावे. नाशिक शहरातील गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंटमध्ये बीएलओंनी अध्यक्ष किंवा सचिवांशी संपर्क साधून एकाच ठिकाणी अनेक कुटुंबांची माहिती मिळवावी. अधिकृत व अनधिकृत झोपडपट्टीच्या ठिकाणी आरोग्य केंद्रे, बसस्थानके अशा ठिकाणी बीएलओंनी उपस्थित राहावे. तसेच मोहिमेची माहिती देणारे फलक लावल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी संबंधित कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि स्वच्छता कर्मचारी यांचीही मतदारांची घरे शोधण्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
उर्वरित काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ पर्यवेक्षक यांनी दररोजचे उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार कामकाजाचे नियोजन करावे. मतदार यादी पुनरीक्षणामध्ये चुका किंवा हलगर्जीपणा झाल्यास भारत निवडणूक आयोग संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर दखल घेऊन कारवाई करेल. चुकीचे काम झाल्यास सुनावण्यांची संख्या वाढेल, त्यामुळे प्रत्येकाने अचूक आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पूर्वी दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

प्रत्येक बीएलओने दररोज किमान 200 गणना अर्जांचे डिजिटायझेशन करावे. उर्वरित अर्ज डिजिटायझेशन केंद्रावर पूर्ण करावेत. सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 9 या वेळेत मतदार घरी उपलब्ध असतात. त्यामुळे बीएलओ, सहाय्यक बीएलओ आणि पर्यवेक्षकांनी या वेळेत फिल्डवर राहून गृहभेटी घ्याव्यात, असे त्यांनी निर्देशित केले. पुढील चार दिवस इतर सर्व नियमित कामे (अत्यावश्यक बाबी वगळता) बाजूला ठेवून संपूर्ण यंत्रणेने मिशन मोडमध्ये काम करावे. बैठकीस गैरहजर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा घ्यावा. तसेच ज्या मतदारसंघांमध्ये बीएलओंची संख्या कमी

आहे, तेथे संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दररोज प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार गृहभेटींचा कालावधी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्ध होईल. 17ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांची सुनावणी पूर्ण करून 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790