नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ‘जागेवर निवड संधी’ रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोजक आणि बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.
हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक-४२२ ००७ येथे आयोजित करण्यात आला आहे. रुषभ इन्स्ट्रुमेंट लिमिटेड, सातपूर यांच्याकडून एकूण ४० रिक्तपदांसह विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आयटीआय इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, COPA, वायरमन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर, PPO, डिप्लोमा तसेच पदवीधारक उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महिला उमेदवारांसाठीही आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ४० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा. भरती इच्छुक नियोजकांनीही www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ या पर्यायावर क्लिक करून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ यावर रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे. मेळाव्याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0253-2993321 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.
![]()


