Amazon

नाशिक: केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

मुंबई। दि. ८ ऑगस्ट २०२६: भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृह येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्ली अंतर्गत नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १६.८० हेक्टर (सुमारे ४१.५१ एकर) जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार,नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा याच संकल्पनेचे मूर्त रूप ठरेल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध होईल, तसेच संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल.

ते पुढे म्हणाले की, नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून देशभरात वेगळी ओळख आहे. आता या प्रकल्पामुळे नाशिकची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होईल. राज्य शासन या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य देत असून, विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून, ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिक येथे अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, तो केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

प्रस्तावित परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डेटा सायन्स (Data Science) विषयातील बी.टेक. अभ्यासक्रमासह विविध आधुनिक व पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत माध्यमातील या अभिनव अभ्यासक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे.

या परिसरात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विकसित करण्यात येणार असून, भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे हे केंद्र देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790