Amazon

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता ४.३ रिश्टर स्केल

नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री सुमारे १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी असून, केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता. मेरी, नाशिक येथून प्राप्त माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.१ Mg इतकी नोंदविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यांतील काही भागांमध्ये हे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच मोठ्या नुकसानीची माहितीही प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक महसूल यंत्रणा संबंधित तालुक्यांच्या संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

घरांची पाहणी करण्याचे आवाहन:
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या घरांची आणि इमारतींची पाहणी करावी. इमारतीला कोणत्याही प्रकारचे तडे (क्रॅक) गेले आहेत का किंवा इमारतीत काही धोका निर्माण झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. धोकादायक परिस्थिती आढळल्यास त्या इमारतीत राहू नये आणि तातडीने स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

विशेषतः दगड-मातीच्या कच्च्या बांधकामाच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घाट परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहावे:
जिल्ह्यातील भूस्खलनप्रवण, विशेषतः घाट परिसरातील नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीला तडे गेले आहेत का, तसेच जमिनीखाली पाणी वाहत असल्याचा आवाज किंवा इतर संशयास्पद हालचाल जाणवत आहे का, याकडे लक्ष द्यावे. अशा प्रकारची परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

भूकंपाच्या वेळी काय काळजी घ्यावी?:
घरात असताना पुन्हा धक्के जाणवल्यास खिडक्या, काचा, कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा. भूकंपाचे धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये तसेच घाईघाईने बाहेर धावू नये. धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे आणि धोकादायक बांधकामांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घराची किल्ली न सापडल्याच्या कारणावरून १९ वर्षीय पत्नीची हत्या; २१ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा

नागरिकांनी अफवा किंवा असत्यापित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये. प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि माहितीकडेच लक्ष द्यावे.

गरज भासल्यास नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

“घाबरण्याचे कारण नाही; मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790