नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२६: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने ३० ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या नीट (युजी) २०२६ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या चारही दिशांनी १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, अधिकृत अधिकारी व कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना या आदेशातून शिथिलता देण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींकडून परीक्षार्थींना कॉपी अथवा इतर साहित्य पुरविण्याची शक्यता लक्षात घेता परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही कारणास्तव संघर्ष अथवा अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये व त्यातून जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर, टेलिफोन एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स, सायबर कॅफे व तत्सम दूरसंचार साधने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा परिसरात डिजिटल डायरी, मायक्रोफोन सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, वायरलेस सेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच अग्नीशस्त्रे व घातकशस्त्रे जवळ बाळगण्यास अथवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये करण्यात येणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस अधिक्षक डॉ. स्वामी यांनी कळविले आहे.
![]()


