नाशिक: जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; धरणे ‘इतकी’ टक्के भरली

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर पावसाचे पुनरागमन झाल्याने बळीराजाला देखील दिलासा मिळाला आहे…

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नाशिकची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला देखील यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर आला आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने गोदावरीचे पात्र कोरडे होते.

मात्र, त्र्यंबकेश्वर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककर देखील सुखावले आहेत. तसेच या पुराच्या पाण्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपू लागली होती. तसेच जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक धरणांमधून कालपासूनच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.

या धरणांतून विसर्ग सुरु:
आज गंगापूर धरणातून ४७१३ क्युसेक, कडवा ६४८२, वालदेवी २०६३, भाम २४४४६, भावली ६९४१ तर दारणा धरणातून ७० हजार ८४८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणसाठा ८७ टक्के इतका असून मागील वर्षी हाच धरणसाठा ९७ टक्के इतका होता.

कोणती धरणे किती टक्के भरली?:
गंगापूर धरण ९५.०८ टक्के, दारणा ९६.२८ टक्के, मुकणे ८४.४६ टक्के, कश्यपी ७७.७५ टक्के, गौतमी गोदावरी ७५.६४ टक्के, पुणेगाव ९३.७४ टक्के, नांदूर मध्यमेश्वर ९६.५० टक्के, वाकी ७१.५७ टक्के, चणकापूर ९०.११ टक्के, कडवा ९०.५८ टक्के, करंजवण ८२.७२ टक्के, भोजापूर ८७.५३ टक्के, पालखेड ८१.६२ टक्के, ओझरखेड ७३.५७ टक्के, वाघाड ९९.६५ टक्के, तिसगाव २९.२३ टक्के तर भावली, आळंदी, भाम, हरणबारी, केळझर आणि वालदेवी धरण १०० टक्के भरले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790