नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पुण्याहून नाशिकच्या दिशेने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक सिन्नर पोलिसांनी पकडला. या ट्रकमधून ९ लाख ७६ हजार रुपये किमतीचा गुटखा हस्तगत केला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नाशिक- पुणे महामार्गावरून नाशिकच्या दिशेने गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने सिन्नरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नाशिक-पुणे महामार्गावर घोटी बायपास येथे संशयास्पद ट्रक पकडण्यासाठी सापळा रचला होता.
पुणे बाजुकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र. एमएच-१५-डीके-५६४३) ची पोलिसांनी तपासणी केली. या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला हिरा पानमसाला, सुगंधीत गोवा, रॉयल ७१७ तंबाखूचा ९ लाख ७६ हजार ८० रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
संशयित ट्रकचालक समीर शफिक इनामदार (वय २४, रा. इंदिरानगर, नाशिक) व त्यास गुटखा विकणारा सनिल रमेश नाईकवाडी (वय ३३, रा. धामणगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुटखा विक्रीच्या रॅकेटसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली असून, आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाली असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले, बाजीराव सानप, हवालदार नवनाथ पवार, पोलिस नाईक समाधान बोराडे, हेमंत तांबडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.