नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी आणि नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील युवकांच्या दोन गटात महिरावणी शिवारात हाणामारी झाली. या हाणामारीत तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आल्याने एक युवक जागीच ठार झाला. तर आणखी दोघांवर नाशिक रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
युवकांच्या दोन गटांमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून एकमेकांना भ्रमणध्वनीवर बोलवून घेतले. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरच्या महिरावणी शिवारात त्यांच्यात हाणामारी झाली. घटनास्थळावर पोलिसांना तीक्ष्ण हत्यारे आढळून आली आहेत. दोन्ही गटांचे मिळून दहा ते बारा युवक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी युवक वगळता अन्य सर्व फरार झाले. मात्र पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अंकुश गोहिरे (वय: १८) असे मयत युवकाचे नाव आहे. हाणामारी झाल्यानंतर जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल सकाळी मयत अंकुश याचे शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिला. जवळपास दोनशे ते तीनशे महिला पुरूषांचा जमाव त्र्यंबक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
त्यांनी अंकुशचा मृतदेह असलेली रूग्णवाहीका थेट त्र्यंबक पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केली. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करा आणि आमच्यासमोर उभे करा असा आग्रह धरला. उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी जमावाची समजुत काढली. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य कमळु कडाळी, देवराम भस्मे, एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे यांनी लेखी पत्र घेतले.