नाशिक (प्रतिनिधी): कसबे सुकेणे येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी ओझर येथे कोठडीत असलेला आरोपी लघवीच्या बहाण्याने पोलिस ठाण्याच्या आवारातून फरार झाला. मंगळवारी (ता.३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांचे धाबे दणाणले आहे.
आरोपी योगेश माळी याला न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर त्यास ओझर पोलिस ठाण्यात आणले होते. त्यानंतर १४ दिवसांसाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याच्या तयारीत असताना सदर आरोपी लघवी लागल्याचे सांगून पोलिस स्टेशन आवारात एका मोकळ्या जागेत गेला. त्याच्यासोबत एक पोलिस कर्मचारी गेला असता हातात बेड्या असलेल्या माळीने सोबत आलेल्या पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये सुरू असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळीच सदर प्रसंग घडल्याने एकच गोंधळ उडाला. ओझरचे पोलिस सदर आरोपीचा सर्वत्र शोध घेत आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत आरोपी सापडून आला नाही.
सदर आरोपीच्या हातातील बेड्या तशाच असून कुठेही आरोपी तसा दिसल्यास त्वरित नाशिक ग्रामीण पोलिसांना अथवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने ओझर येथे बैठक घेत सूचना केल्या असून पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.