नाशिक (प्रतिनिधी): थकीत असलेल्या मुद्दल कर्ज रकमेच्या ५ टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याचे मोबदल्यात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील हे दीड लाखाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधून कर्ज घेतले होते. त्यांनी सदरील कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले होते. त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी किती रक्कम भरावी लागेल याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे सदरील संस्थेच्या मुख्य कार्यालय, जळगाव येथे गेले असता सदरील संस्थेत काम करणारा कर्माचारी सुनील पाटील याने तक्रारदार यांची आई व व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या / वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या 5 टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे, यांचेकडून परवानगी देण्याचे मोबदल्यात नासरे व स्वतः साठी लाचेची मागणी केली.
त्यानंतर सुनील पाटील याने मागणी केलेली लाचेची रक्कम कमी होणार नाही असे चैतन्य नासरे याने तक्रारदार यास सांगून सुनील पाटील याचे कडे सुपूर्द करण्यास सांगितली. त्यावरून सुनील पाटील याने सदरील मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई संदीप बबन घुगे (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), सह सापळा अधिकारी अमोल वालझाडे (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.