नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गाने धुळ्याकडे अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी करणारा ट्रक नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सोग्रस फाट्यावर पकडला. या ट्रकमधून तब्बल ४३ लाखांचा विदेशी मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. सदरील विदेशी मद्य हे गोव्यातील असल्याचे तपासातून समोर आले आहे.
पद्मसिंग कैलास बजाड (३५, रा. जळकू ता. मालेगाव, जि. नाशिक. हल्ली रा. अश्विननगर, सिडको, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर, सदरचे मद्याचा पुरवठादार व ते विकत घेणाऱ्यांचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. संशयित बजाड यास न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मुंबई-आग्रा महामार्गाने धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून अवैध विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (ता.५) रात्री चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे सापळा रचला होता.
संशयित ट्रक (एमएच १५ एचएच ६३६१) आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये गोव्यात परवानगी असलेला मद्यसाठा ट्रकमध्ये भरून दिला. तसेच मद्यसाठा दडविण्यासाठी ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड टाईपची पावडर असल्याचे भासविले.
तसे बनावट बिलाच्या पावत्याही बनविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली. तसेच, ४३ लाख ८०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व ट्रक व मोबाईल असा १८ लाख ६ हजारांचा मुद्देमाल असे एकूण ६१ लाख ६ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, हेमंत गिलबिले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोडे यांच्या पथकाने बजावली.