नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
उपचारासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करत अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत काढून नेल्याची घटना घडली.
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे 63वर्षीय महिलेला तुमच्या नातवाचा अपघात झाला असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करत अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत काढून नेल्याची घटना घडली.
सुशिला शिवाजी शेळके (६३) रा. नांदुर-निमोण रस्ता या शनिवारी सायंकाळच्या सुमारास घराजवळच्या शेतात काम करत होत्या. यावेळी अंदाजे ३० ते ३५ वर्षीय भामटा दुचाकीवरुन तेथे आला. त्याने सुशिला यांना तुमच्या गणुचा मुलगा पडला असून त्याला जबर दुखापत झाल्याचे सांगितले.
त्याला दवाखान्यात न्यायचे असून गणुने पैसे आणण्यासाठी तुमच्याकडे पाठवल्याचे तो म्हणाला. तसेच पैसे नसेल तर गणुने तुमच्या गळ्यातील पोत व पावती मागीतली असल्याचे तो सुशिला यांना म्हणाला. नातवाचा अपघात झाल्याचे ऐकून प्रचंड घाबरलेल्या सुशिला यांनी कुठलीही विचारपुस न करता आपल्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत दुचाकीवरुन आलेल्या या भामट्याच्या हातात दिली.
त्याने सोन्याची पोत हातात पडल्यावर तेथून पोबारा केला. रात्री घरी गेल्यावर त्यांच्या मुलाने असे काही घडले नसल्याचे सांगितले. नातू सुखरुप असल्याचे व त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांना आपण लुटलो गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात श्रीमती शेळके यांनी तक्रार दाखल केली. साहेब पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक देविदास लाड तपास करत आहेत.