नाशिक (प्रतिनिधी): वाहनाच्या तोडफोडीप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना २०२२ साली अंबड पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी (दि.३०) पार पडली. न्यायाधीश मनिषा कुलकर्णी यांनी चौघांना दोषी धरले. दोन वर्षे ५ महिन्यांचा साधा कारावास व ५० हजारांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
चुंचाळे शिवारात आरोपी उद्धव उर्फ टकल्या अशोक राजगिरे (२०), लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी (२०), भूषण सुरेश सिंग (३३) व आदित्य उर्फ आद्या देवानंद पांडे (२०, चौघे रा. चुंचाळे घरकुल प्रकल्प) यांनी परिसरात आरडाओरड करत वाहनांची तोडफोड केली होती. पीडित फिर्यादी महिलेने त्यांना यावेळी विरोध केला होता.
यामुळे या चौघा आरोपींनी पीडितेचा विनयभंगाच्या करून तिला मारहाण केली, तसेच तिच्या मुलाला धमकावले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले.