नाशिक। दि. २६ नोव्हेंबर २०२५: शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षापूर्वी स्वस्तात फ्लॅट आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी निल राजेंद्रभाई ठाकूर (२८, रा. पाथर्डीफाटा, मूळ गुजरात) यास तीन वर्षाची सक्तमजुरी व ५० हजारांचा दंड ठोठावला.
पाथर्डी शिवारातील दामोदरनगर भागात २०२१-२०२२ या कालावधीत आरोपी ठाकूर याने एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा स्वतः भाचा असल्याची ओळख सांगून स्वस्त दराने फ्लॅट, गाळे घेऊन देतो, असे काहींना सांगितले होते. फिर्यादी भूषण वरखेडे (२९, रा. प्रशांतनगर) यांच्यासह अन्य साक्षीदारांकडून ऑनलाईन स्वरुपात तब्बल ६४ लाख ८२ हजार ३४० रुपये उकळले होते.
तसेच अन्य काही जणांना रेल्वेत सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून २ लाख ५० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार घडला याप्रकरणी होता. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन निरीक्षक एन.डी. पगार यांनी तपास करत पुराव्यांसह दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. वनवाडी यांच्या न्यायालयाने ठाकूर यास दोषी धरले.
![]()
