Amazon

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये ३३६ जणांवर कारवाई

नाशिक। दि. ४ नोव्हेंबर २०२६: शहरातील वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा महिन्यांत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३६ चालकांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज मोजणार प्रदूषण मंडळ; नाशिकमधील 'या' ५ ठिकाणांवर विशेष लक्ष

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासह अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सात स्वतंत्र ‘क्रिटिकल कॉरिडोर’ पथके तैनात करण्यात आली आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; १८ गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी

या पथकांकडे संबंधित मार्गांवरील वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर या पथकांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण १,६१५ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३६ चालकांचा समावेश आहे.

मद्यपान करून वाहन चालवणे हे अपघातांचे प्रमुख कारण ठरू शकते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला ३ वर्षांचा कारावास

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि स्वतःसह इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790