नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): 4 वर्षीय चिमुकल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलगा खेळता खेळता पाण्यात पडला असावा असं कुटुंबाला वाटलं. पण त्याच्या मृत्यूनंतर समोर आलेलं सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्वच हादरले. मुलाच्या मृत्यूचा धक्कादायक व्हिडीओ सर्वांसमोर आला.
मालेगाव शहराच्या दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बालकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. दातारनगर भागात राहणारे चार बालके विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलासह खेळत होती.
खेळतांना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काहीवेळ येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित तेरा वर्षीय मुलाने हस्सन मलीक मुदस्सीर हुसेन (वय साडेतीन वर्षे, रा. दातारनगर) या याला सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. सुरुवातीला सांडपाण्यात बुडून या चिमुलक्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय होता.
बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरुन सांडपाण्याच्या डबक्यानजीक कारखान्यात व अन्यत्र सीसीटीव्ही आहे का याची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी कारखान्याचा सीसीटीव्ही तपासला असता ही घटना निदर्शनास आली. पवारवाडी पोलिस ठाण्यात विधी संघर्षीत बालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन या संशयिताला ताब्यात घेऊ, असे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले.