नाशिक। दि. १९ जानेवारी २०२६: जिल्ह्यातील मालेगाव–मनमाड मार्गावर वऱ्हाणे गावाजवळ सोमवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मालेगावकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले, त्यामुळे बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातातील मृत व जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही.
या अपघातामुळे काही काळ मालेगाव–मनमाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस, आपत्कालीन पथके आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
![]()


