बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे फसवणूक; सेबीची मान्यता नसतानाही शेअर ट्रेडिंग सुरू असल्याचे भासवले
नाशिक। दि. २६ नोव्हेंबर २०२६: करमुक्त ट्रेडिंग आणि तब्बल ५०० पट मार्जिन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवकाची पाच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी सायबर भामट्यांनी बनावट ट्रेडिंग अॅप आणि संकेतस्थळाचा वापर केला. याप्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने ‘ट्रेड बाजार’ नावाच्या ट्रेडिंग अॅपप्लिकेशन आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. या प्लॅटफॉर्मवर शेअर ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध असल्याचे भासवण्यात आले. मात्र, संबंधित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला सेबी अथवा मान्यताप्राप्त शेअर बाजाराची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी फिर्यादीला ५०० पट मार्जिन तसेच करमुक्त ट्रेडिंगचे आकर्षक आमिष दाखवून विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे पाच लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात कोणतेही अधिकृत शेअर बाजारातील व्यवहार न करता बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदींच्या माध्यमातून ट्रेडिंग सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आणि फिर्यादीच्या पैशांचा अपहार करण्यात आला.
या फसवणुकीप्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
![]()


