🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.3 °C

नाशिक: संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत साल्हेर किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालेगाव। दि. २६ नोव्हेंबर २०२६: ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याचे वैभव जतन करण्यासोबतच परिसरातील जैवविविधता व नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. साल्हेर परिसराच्या विकास आराखड्यात स्थानिक नागरिकांच्या सूचना व अपेक्षांचा समावेश करून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील. तसेच पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी कापशीबारी मैदान येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. भुसे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा आमदार सुहास कांदे, नगरसेविका जयश्री गरुड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखरे पाखले, प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, सामाजिक न्याय विभागाचे मुकेश कानडे, नायब तहसीलदार सचिन मारके, सरपंच राणी भोये, उपसरपंच मधुकर भोये, जयप्रकाश सोनवणे, सुभाष नंदन, डॉ. जतिन कापडणीस, फरहान खान आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि दुर्गप्रेमी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर; गर्दी, वाहतूक व्यवस्थापनाला मिळणार बळ

मंत्री श्री. भुसे म्हणाले, २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संविधानाने देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये दिली आहेत. संविधानातील तरतुदींचे पालन करणे आणि या मूल्यांचे आचरण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे ऐतिहासिक गड-किल्ले हे आपल्या स्वराज्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असून त्यांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे.

राज्यातील अकराहून अधिक ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर संविधान दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात साल्हेर किल्ल्याला विशेष स्थान आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी निवडलेल्या मराठा लष्करी भूप्रदेशातील किल्ल्यांमध्ये साल्हेरचा समावेश आहे. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधतेचेही संरक्षण करणे गरजेचे आहे. हा वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

साल्हेर परिसराच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी पाणी अडविणे, पायाभूत सुविधा, पर्यटन विकास तसेच स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कामांबाबत ठोस सूचना व प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर रोजी नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी

विद्यार्थ्यांनी आपल्या घरापासून, शाळेपासून तसेच सार्वजनिक ठिकाणांपासून कचरा आणि प्लास्टिकमुक्त वातावरण राखण्याची सवय लावून घ्यावी. साल्हेर परिसरात ऐतिहासिक वारशासोबतच दुर्मिळ वनस्पती आणि समृद्ध जैवविविधता आहे. या नैसर्गिक ठेव्याचे जतन करणे ही शासनासोबतच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र शासनाच्या माध्यमातून यापूर्वी किल्ल्याच्या विकासासाठी काही प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या कामांचा पाठपुरावा करून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गुजरातसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतील पर्यटक साल्हेर परिसरात आकर्षित होतील, अशा पद्धतीने पर्यटन विकासाचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या प्रश्नांवर तहसीलदारांनी संबंधित विभागांची बैठक आयोजित करावी. या बैठकीस गटविकास अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना सहभागी करून परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. पोलीस चौकीची आवश्यकता, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती व विकासासाठी गावनिहाय आवश्यक निधीचे प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावांना मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.

पाणी आणि हवेच्या प्रदूषणासह विविध माध्यमांतून होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे आचरण प्रत्येकाने करावे, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मॉडिफाईड सायलेंसर लावणाऱ्या ४२ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

आमदार सुहास कांदे म्हणाले, ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ या उपक्रमातून गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची जाणीव समाजात निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत उभारलेले गड-किल्ले हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा ठेवा आहे. साल्हेरसह राज्यातील सर्व गडांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना नियमितपणे गड-किल्ल्यांच्या अभ्यासभेटी घडवून त्यांच्या संवर्धन, स्वच्छता आणि संरक्षणाबाबत जागरूक करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘स्वराज्याचा वारसा, संविधानाचा वसा’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे शाखा जळगाव आणि खानदेश लोकरंग फाउंडेशन, देवळा यांच्या वतीने शाहीर शिवाजी पाटील, शाहीर जितेंद्र भांडारकर, शाहीर अशोक पाटील व सहकाऱ्यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर आधारित माहितीपर पोवाडे सादर केले. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, साल्हेर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री श्री. भुसे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत गडमित्र, युवक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उप प्रादेशिक अधिकारी श्री.पाखले यांनी तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790