नाशिक: एफडीमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १.२२ कोटींची फसवणूक; सातपूरमधील संशयिताला अटक

नाशिक। दि. २५ नोव्हेंबर २०२६: फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (एफडी) गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज आणि मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन जणांची तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. विजय सुधाकर वाघमारे (वय ४३, रा. सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे स्वतःच्या कंपनीच्या खात्यात वळवून घेतल्यानंतर बनावट बँक स्टेटमेंट आणि खोट्या शिक्क्यांच्या आधारे त्याने गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संशयित वाघमारे याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज आणि भरघोस परतावा मिळेल, असे आश्वासन देत त्याने दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडियाचे धनादेश घेऊन त्याद्वारे रक्कम स्वतःच्या फायन सिक्युरिटीजच्या बँक खात्यात जमा केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर रोजी नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी

मात्र, गुंतवणुकीसाठी घेतलेल्या या रकमेचा एफडी करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याने अपहार केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने गुंतवणुकीचे एफडी प्रमाणपत्र मागितल्यानंतर त्याने इंदुसइंड बँकेचे बनावट खाते विवरण तयार केले. त्यावर बँकेचे खोटे शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवले. या प्रकारातून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीची एकूण ८६ लाख १ हजार ४७ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

उपनगरमध्येही ३६ लाखांची फसवणूक

वाघमारे याने अशाच पद्धतीने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका व्यक्तीची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी १३ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हसरूळ आणि उपनगर या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील फसवणुकीची एकूण रक्कम १ कोटी २२ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 8 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर वाघमारे पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो कर्नाटक, गोवा, मुंबई आणि पुणे अशा विविध ठिकाणी फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने वापरलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आणि ई-मेल आयडीचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला.

२३ नोव्हेंबर रोजी तो सातपूर येथील आपल्या घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी सायंकाळी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा जोर ओसरला; आज (दि. २४) किमान तापमानाचा पारा १६.७ अंशांवर

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, पोलीस अंमलदार स्वप्निल गांगुर्डे, गुणवंत गायकवाड, पंकज महाले, महिला पोलीस हवालदार संगीता कनोज आणि महिला पोलीस अंमलदार जिजा भुसारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790