Amazon

नाशिकरोडच्या अर्जुन पिवाल टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२६: नाशिकरोड परिसरात संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या अर्जुन सुरेश पिवाल टोळीविरुद्ध नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. गोसावीवाडी येथे सुमित अरुण पगारे याची गोळीबार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील तपास, आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित गुन्हेगारीतील सहभागाचे पुरावे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे.

सुमित पगारेच्या हत्येने उडाली होती खळबळ:
१६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी नाशिकरोड येथील गोसावीवाडी परिसरातील गंगोत्री जनता स्टोअर्ससमोर सुमित पगारे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

🔎 हे वाचलं का?:  अन्न भेसळखोरांना FDA चा दणका! नाशिक विभागात १२० आस्थापनांचे परवाने निलंबित; ३.७८ कोटींचा साठा जप्त

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. हत्येचा कट रचण्यापासून प्रत्यक्ष गोळीबारापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये अग्निशस्त्रांचा पुरवठा, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली वाहने, संशयित आरोपींच्या हालचाली तसेच हत्येनंतर घडलेल्या घटनांचाही तपास करण्यात आला.

१६ आरोपी अटकेत; सात जणांचा शोध सुरू:
या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ आरोपींना अटक केली आहे. तर आणखी सात आरोपींचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली वाहने, अग्निशस्त्रांशी संबंधित साहित्य, काडतुसे, मोबाइल फोन, सिमकार्ड आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली कॅम्प येथे १३ नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव; नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

तपासातून टोळीतील सदस्यांच्या कथित भूमिका, गुन्हेगारी कारवायांमधील सहभाग आणि पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईला मंजुरी दिली.

संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा:
शहरात संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790