नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): घोटी शहरातील पचितराय बाबा नगरासमोर दोन दिवसांपूर्वी दगडाने ठेचून झालेल्या एका तरुणाच्या खूनाचा घोटी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे अवघ्या बारा तासांत छडा लागला आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहरापासून हाकेच्या अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला युवकाचा मृतदेह सापडला होता. मुकणे येथील रूपेश संतू साबळे (वय ४२) हे सहा महिन्यांपासून घोटीत राहण्यासाठी आले होते. त्यांची पत्नी सविता (वय ३२) शहरातील एका खासगी रुग्णालयात कामाला होती. शहरातील माधव कडू (वय २५) याचे तिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने व प्रेमात पती रूपेशचा अडसर येत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी पाच ते सहा दिवसांपासून कट माधव रचत होता.
रूपेश हा कायम मद्यधुंद राहात असल्याने पत्नीचे व त्याचे पटत नव्हते. तर माधव हा कायम संसारत आर्थिक सहकार्य करीत असल्याने माधव व सविता यांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण रूपेशला लागली होती. यामुळे त्याने माधवला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून माधवने रूपेशबरोबर मैत्री करत त्याला दारू पाजली. घटनास्थळी दोनदा दारू पिऊन मारण्याचे प्रयत्न केले. मात्र रूपेश हा सावध असल्याने प्रयत्न फसले.
गुरुवारी (ता.२५) माधवचा जोडीदार गोरख कडू (वय ३०) याने रूपेशला बोलावत प्रचंड दारू पाजली. यात रूपेश मद्यधुंद होऊन झोपी गेल्याने त्याच्या पत्नीने फोनवरून त्यास मारण्यास सांगितले. यामुळे माधव व गोरख यांनी रूपेशच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
गुन्हा उघड करण्यासाठी पोलिस निरीक्षक विनोद पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक अजय कौटे, अनिल धुमसे, सुदर्शन आवारी, सहायक उपनिरीक्षक राऊत, हवालदार गणेश देवकर, रामकृष्ण लहामटे, केशव बस्ते, सागर सौदागर यांनी कामकाज केले.
दारूच्या बाटलीमुळे उलगडा:
ज्या दुकानावरून दारू विकत घेतली त्या बाटलीवरील बॅच नंबर व घटनास्थळी पडलेल्या बाटलीवरील नंबर व कंपनी एकच होती. दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी व मृत हे एकत्र आल्याचे दिसून आल्याने तातडीने अज्ञताचा शोध व गुन्ह्याचा शोध लावण्यात यश आले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली असून खुनात सहभागी महिलेस जिल्हा कारागृहात पाठवले आहे.