नाशिक (प्रतिनिधी): शहरात आज (शनिवार दि. २८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे मुंबईनाका, त्र्यंबकरोड, गंगापूररोड परिसरात दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यक्रम होणार असल्याने या वेळांमध्ये कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
मुंबईनाका येथे महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होत असल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद राहणार आहे. कार्यक्रमास आलेल्या नागरिकांच्या वाहनांकरिता दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगद्याजवळ, ईदगाह मैदान येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे. शासकीय दूध डेअरी येथे होणाऱ्या कार्यक्रमास आलेल्या वाहनांकरिता बांधकाम भवन पार्किंग, पंचायत समिती कार्यालय, उत्तर महाराष्ट्र सिंचन भवन उंटवाडीरोड, दक्षिणमुखी हनुमानसमोरील तिडके कॉलनीकडे जाणाऱ्या नवीन रोडवर कृषी भवन येथे देण्यात आले आहे. या रस्त्यांवरील वाहतूक वेळेवर गरजेनुसार वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले.
गंगापूररोडवर होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान उदघाटन कार्यक्रमास आलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था होरायझन शाळेशेजारी मोकळ्या जागेत करण्यात आली आहे.