कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय
नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखेच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव काठेगल्ली सिग्नल ते वडाळारोडवरील नागजी सिग्नल चौकापर्यतचा मुख्य रस्ता बुधवारी (दि. १६) रात्री बारा वाजेपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मंगळवारी अधिसूचना काढली आहे.
काठेगल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडाळारोडवरील नागजी सिग्नलपासून पुढे दुतर्फा वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरून बुधवारी रात्रीपासून वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
मुंबईनाक्याकडून भाभानगर व काठेगल्ली पखालरोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वडाळानाकामार्गे द्वारका व वडाळारोडमार्गे भारतनगर, अशोका मार्गावरून पुढे इतरत्र जाईल. तसेच काठे गल्लीकडून येणारी वाहने पुणे महामार्गावरून सरळ द्वारका चौकाकडे व तेथून डावीकडे वळण घेत मुंबईनाक्याच्या दिशेने रवाना होतील.
हे निर्बंध बुधवारी रात्री बारा वाजेपासून लागू होणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. सर्व नागरिकांनी या अधिसूचनेचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्बंध पोलिस सेवेतील वाहने, शासकीय सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनदलाची वाहने यांना लागू राहणार नसल्याचेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.