👉 शरयू पार्क रस्ता बकाल: घंटागाडी अनियमित; कचरा पडून
महामार्गावरील शरयू पार्क परिसरात घंटागाडी अनियमित येत असल्याने कचरा पडून राहत आहे. परिसरातील रस्त्यांवर कचरा असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना घंटागाडीची तासन्तास वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. त्यामुळे काही नागरिक रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकतात. दुसऱ्या दिवशी घंटागाडी कर्मचारी कचरा उचलत नसल्याने कचऱ्यातून दुर्गंधी येते. पालिकेने घंटागाडी नियमित सुरू करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
👉 श्वान पकडण्याची मागणी; मोकाट श्वानांमुळे नागरिक दहशतीत
महामार्गावरील अमृतधाम, औदुंबरनगर परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहे. रात्री कुत्रे वाहनांच्या मागे धावतात. चावा घेण्यापासून बचाव करण्याकरिता वाहनचालक वेगात वाहने चालवत असल्याने अपघात घडत आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांवर कुत्रे भुंकतात, काही नागरिकांना चावा घेतला आहे. मनपाने मोकाट कुत्रे पकडून नेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
👉 कॅट १ जानेवारीपासून राबविणार ‘प्रत्येक शहर अयोध्या, घर घर अयोध्या’ उपक्रम
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विहिंपने आयोजित केलेल्या उपक्रमात कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सही (कॅट) सहभागी होणार आहे. कॅटतर्फे १ जानेवारीपासून ‘प्रत्येक शहर अयोध्या, घर घर अयोध्या’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी दिली. या अंतर्गत बाजार आणि निवासी परिसरात राम फेरी, व्यापारी संघटनांशी संवाद, राम भजनांचे आयोजन, श्रीराम मंदिराचे मॉडेल वाजवी दरात उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांचा यात समावेश आहे.
👉 ‘सूर शारदा’तर्फे रविवारी मोहम्मद रफींच्या गाण्यांची ‘तुमसे अच्छा कौन है’ मैफल
प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गायक घनश्याम पटेल यांनी ‘तुमसे अच्छा कौन है’ या मैफलीचे आयोजन केले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ही विनामूल्य मैफल होईल. मोहम्मद रफींची निवडक गाणी प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील, अमित गुरव सादर करतील.
👉 पाथर्डी फाटा येथील जगन्नाथपुरी मंदिरात आजपासून श्रीमद् भागवत कथा सप्ताह
इंदिरानगर पाथर्डी फाटा येथील जगन्नाथपुरी मंदिर, समर्थनगर येथे संकेत दीक्षित महाराज यांची श्रीमद् भागवत कथा २२ ते २८ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत कथा चालेल. प्रशांत बडगुजर, संजय नवले आणि साईराम सेवा समितीने सप्ताहाचे आयोजन केले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
👉 अंबड परिसरातून तडीपार गुन्हेगार अटकेत, परिमंडळ २ च्या पथकाकडून कारवाई
शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. इंदिरा गांधी वसाहत, अंबड येथे पोलिसांनी ही कारवाई केली. किशोर चंद्रभान आहेर (रा. अंबड) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, परिमंडळ २ कार्यालयाने तडीपार केलेला गुन्हेगार इंदिरा गांधी वसाहत येथे आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. संशयिताने तडीपार असताना आदेशाचे उल्लंघन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
👉 देवळाली कॅम्प परिसरात रंगकाम करताना इमारतीवरून कोसळून कामगार ठार
इमारतीला रंग देत असताना पाय घसरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात कामगार ठार झाला. संसरी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील दशरथ दोंदे (४०, रा. देवळाली कॅम्प) हे संसरी लेन नंबर २ येथे इमारतीला रंग देत असताना खाली कोसळले, त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांना लागलीच नजीकच्या दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करत आहेत.
👉 टिळकवाडीतील रस्त्याच्या कामानंतर सर्वत्र खडी, वाहनधारकांच्या वाढल्या तक्रारी
टिळकवाडीतील रस्त्यातील काम करण्यात आले खरे, मात्र रस्त्यावर माती, खडी तशीच पडून असल्याने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
👉 कंपनीमधून कॉपर वायर्सची चोरी; उद्योजकांकडून पोलिस गस्तीची मागणी
शटरचे कुलूप तोडून कंपनीच्या आवारात ठेवलेली ६६ हजारांची कॉपर वायर चोरी करण्यात आली आहे. अंबड एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि सिद्धार्थ भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बूस्ट इलेक्ट्रॉनिक आयमा लाइन, अंबड या कंपनीच्या शटरची कडी-कुलूप तोडून आवारात चोरट्यांनी येथे ठेवलेली महागडी कॉपर वायर चोरी करून नेली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.