
नाशिक। दि. १६ ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक पोलीस दलात दाखल झालेल्या वन मोबाईल व्हॅनचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले
यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलिस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त किशोर काळे, चंद्रकांत दळवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘वन मोबाईल व्हॅन’ ही पोलीस दलासाठी गतिशील नियंत्रण व समन्वय केंद्र म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमुळे आपत्कालीन परिस्थितीत तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस दलाला घटनास्थळी तातडीने पोहोचून प्रभावीपणे कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. विविध बंदोबस्त, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानची गर्दी नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच घटनास्थळी तातडीने पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी या वाहनाचा प्रभावी वापर करता येणार आहे.
मोबाईल व्हॅनमध्ये विविध सुविधा:
वन मोबाईल व्हॅनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, वायरलेस सेट व VHF कम्युनिकेशन प्रणाली, मोबाईल फोन व डेटा कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर सायरन, फ्लॅशर आणि सार्वजनिक उद्घोषणा (PA) प्रणालीमुळे घटनास्थळी आवश्यक त्या सूचना तातडीने देणे शक्य होणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार CCTV/कॅमेरा व घटनास्थळाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने महत्त्वाच्या घटनांचे निरीक्षण व नोंद ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, बॅटरी किंवा जनरेटरची व्यवस्था, फर्स्ट-एड व प्राथमिक उपचार साहित्य तसेच विविध आपत्कालीन व सुरक्षा साहित्याची सुविधा या मोबाईल व्हॅनमध्ये उपलब्ध आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात विविध मोठे धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम सातत्याने आयोजित होत असतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने पोलीस दलासमोर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची आव्हाने असतात. या पार्श्वभूमीवर वन मोबाईल व्हॅनमुळे घटनास्थळी पोलीस यंत्रणेचा जलद प्रतिसाद, प्रभावी संवाद आणि समन्वय साधण्यास मदत होणार आहे.
![]()


