नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): तीन दिवसांनी सरत्या वर्षाला निरोप देत सन २०२४ चे दमदार स्वागत करण्यासाठी सज्ज होत असलेल्या नाशिक शहरात तळीरामांना आवर घालत धडक कारवाईसाठी नाशिक पोलिसही सज्ज झाले आहेत. बुधवार (दि. २७)पासून शहरात सर्वत्र नाकाबंदी नेमून तळीरामांचा ‘बंदोबस्त’ करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
रात्री आठ वाजेपासून पहाटेपर्यंत ठिकाठिकाणी पोलिसांनी बेशिस्त चालक, हुल्लडबाजी करणाऱ्यांसह मद्यपींची धरपकड केली. यंदा ३१ डिसेंबर रविवारी असल्याने मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
शहरातील प्रमुख चौकांत, रिकाम्या भूखंडांजवळ, मैदानांलगत व संशयास्पद ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढविली आहे. यादरम्यान वाहतूक विभागाच्या चारही युनिटने स्वतंत्र बंदोबस्त तैनात करून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे.
गल्लीबोळांतल्या अंडाभुर्जी, पावभाजी, रोल्स व इतर हातगाड्यांवरही पोलिसांनी नजर ठेवली आहे. शहरातील ‘सीसीटीव्हीं’मार्फत नियंत्रण कक्षातून सेलिब्रेशनवर पथकांचा वॉच राहणार आहे. यंदा ताब्यात घेतल्यावर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची तंबीदेखील पोलिस आयुक्तालयाने दिली आहे.
त्यामुळे नाशिककरांनी नियमांत राहूनच सेलिब्रेशन करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. बुधवारपासूनच पोलिसांनी शहरात तळीरामांचा ‘बंदोबस्त’ करण्यास प्रारंभ केल्याने नववर्ष स्वागतावेळी धिंगाणा नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
बंदोबस्ताचे नियोजन:
- चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तांसह सर्व अधिकारी-कर्मचारी
- शहरभरातील १३ पोलिस ठाण्यांचा बंदोबस्तही राहणार तैनात
- तीन गुन्हे शाखा, चार गुन्हे शोध पथकांची सज्जता
- शहरात सर्वत्र नाकाबंदीसह जागोजागी होणार तपासणी
- राज्य राखीव दलाच्या तुकड्याही शहरात हजर
- पाचशेपेक्षा अधिक होमगार्ड; दंगल नियंत्रण पथक; जलद प्रतिसाद पथक सज्ज
३१ डिसेंबरच्या ‘सेलिब्रेशन’च्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस ठाण्यांसह वाहतूक पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बुधवारी रात्रीपासून नाकाबंदी करून मद्यपींची तपासणी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात येत आहेत.-चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक