नाशिक: भामट्यांचा सूळसुळाट; बघा ATM मध्ये पैसे काढायला गेलेल्या या आजोबांना कसं फसवलं..
नाशिक (प्रतिनिधी): एटीएम सेंटर मध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यास गेलेल्या ७३ वर्षाच्या आजोबांना मदत करण्याचा बहाणा करत अनोळखी व्यक्तीने कार्डची अदलाबदल केली. आणि,
ऑनलाइन एक लाख ५१ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार एसबीआय बँकेच्या हॉटेल जत्रा शाखेच्या एटीएम सेंटरमध्ये उघडकीस आला.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि कचरू झोमान (रा. आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते एसबीआय एटीएम सेंटरमध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यास गेले होते. एका अनोळखी व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा करत कार्ड घेतले. स्टेटमेंट काढण्यासाठी पिन नंबर टाकण्यास सांगितला. पिन नंबर लक्षात ठेवत या आजोबांना दुसऱ्याचे कार्ड दिले. काही वेळात संशयिताने या आजोबांच्या बँक खात्यातून १ लाख ५१ हजारांची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. त्यामुळे आता पैसे काढायला जाल तेव्हा सावध रहा. तुम्हाला मदत लागलीच तर बँकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्या. अनोळखी व्यक्तीला तुमचा एटीएमचा पिन सांगू नका.