नाशिक (प्रतिनिधी): वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने दोन उष्माघात कक्ष कार्यन्वित केले आहेत. या कक्षात पंखा, एसी, कूलर आणि तत्सम सुविधांबरोबरच ‘ओआरएस’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या उन्हाचा तडाखा जाणवू लागले आहे. मार्च महिन्यातच उच्चांकी तापमान सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. नाशिक हे मुळातच थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवला तरी विदर्भाच्या तुलनेत ऊन कमीच असते.
तथापि, उन्हामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने काळजी घेण्याचे आवाहन करतानाच दोन कक्षदेखील कार्यान्वित केले आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. नाशिकरोड येथील बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय, तसेच जुन्या नाशकात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात हे कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. यात थंड हवेसाठी कूलर, एसी किंवा पंखे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.