नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सिटू व माकपच्या नेतृत्वाखाली कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून आंदोलक पायी चालत दाखल झाले आहेत. या आंदोलकांपैकी एका शेतकरी आंदोलकाचा सोमवारी (ता. २६) सायंकाळी मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भाऊसाहेब बाबुराव गवे (६५, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी) असे मयत आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाभरातून आंदोलक पायी चालत सोमवारी दुपारी शहरात दाखल झाले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे.
गवे हे रविवारी (ता. २५) त्यांच्या राहत्या गावावरून आंदोलनासाठी पायी चालत निघाले आणि सायंकाळी सहा वाजता म्हसरुळ येथे आंदोलकांच्या मुक्कामी पोहोचले होते. त्यानंतर सोमवारी (ता. २६) सकाळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला.
सायंकाळी गवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांसमवेत बसलेले असताना त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध झाले. त्यांचे भाऊ रावसाहेब दवे यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू केले.
मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गवे यांचा मृत्यु हृदयविकार वा अशक्तपणामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल.