नाशिक (प्रतिनिधी): सोन्यामुळे एकाचा मर्डर झाला आहे. तुम्ही एवढे सोने घालून का फिरता असे बोलून तोतया पोलिसांनी वृद्धेचे दोन लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेत फसवणूक केली. जेलरोड येथील सार्वजनिक उद्यानाजवळ हा प्रकार घडला. उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि जेल रोड येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेने दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे शिवमंदिरातून दर्शन घेऊन घरी नारायणबापूरोडने पायी जात असताना परिसरातील रेणुका हॉस्पिटलजवळ सार्वजनिक उद्यानाशेजारी दोन अनोळखी इसम उभे होते. त्यांनी वृद्धेला आवाज देत बोलवून घेतले.
‘आम्ही पोलिस आहोत’ तुम्ही गळ्यात एवढे सोने घालून का फिरता, येथे सोन्यामुळे एकाचा मर्डर झाला आहे. तुम्ही तुमचे सोने काढून आमच्याकडे द्या. आम्ही ते व्यवस्थित ठेवतो असे सांगितले. रवींद्रन यांनी भीतीपोटी अंगावरील ५६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १२ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, ४ ग्रॅमची अंगठी असा ऐवज काढून दिला. संशयितांनी कागद काढून घेत कागदाचा बोळा पर्समध्ये ठेवला. ‘येथून पुढे काळजी घ्या’ असे सांगून दोघे निघून गेले. रवींद्रन घरी आल्यानंतर त्यांनी कागदाचा बोळा काढला असता त्यात दागिने मिळून आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे तपास करत आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५९/२०२५)