नाशिक (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड येथील मिलिटरी डेअरी फार्मच्या ४०० एकरच्या विस्तीर्ण मैदानात २४ जानेवारीपासून निरंकारी मिशनचा तीन दिवसीय संत सत्संग सुरू होत आहे. या संत सत्संगाची सांगता २६ जानेवारी रोजी होणार आहे. या संत सत्संगासाठी नाशिक येथून ५ हजार भाविक जाणार आहेत.
मुख्य सत्संग कार्यक्रम तिन्ही दिवस दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल. त्यात देशभरातून येणारे अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरू आणि ईश्वराप्रती आपल्या भावना व्यक्त करतील. रात्री ८ वाजेपासून सर्वांना सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांचा आशीर्वाद लाभणार आहे. मागील एक महिन्यापासून महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांतून निरंकारी भाविकांनी सत्संगस्थळी येऊन निष्काम सेवेच्या माध्यमातून सत्संग स्थळाला एका सुंदर नगरीच्या रूपात परिवर्तित केले आहे. मानवतेच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या संत सत्संगात नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.