नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक। दि. १३ नोव्हेंबर २०२५: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

सुरुवातीला मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला मान्यवरांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

जिल्हा परिषद नाशिक नूतन इमारतीची वैशिष्ट्य:
त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेली जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत इमारत जिल्हा परिषदेच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. शाश्वत विकास, ऊर्जा बचत, सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे.

ऊर्जासक्षम बांधकाम, पुरेसा नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा, तसेच छतावर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. 25) सायकल रॅली

इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययन, संशोधन आणि संदर्भासाठी सुविधा आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आरामदायी विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहेत.

परिषद, प्रशिक्षण, बैठका आणि कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा असलेले बहुउद्देशीय सभागृह आणि सर्वसाधारण सभा हॉल तयार करण्यात आला आहे. यासह मनोरंजन कक्ष,उपहारगृह, अॅम्फीथिएटरयुक्त प्रांगण व कोर्टयार्ड, पार्किंग सुविधा, सुरक्षा यंत्रणा, प्राथमिक उपचार केंद्र, सहा कॉन्फरन्स हॉल, प्रत्येक मजल्यावर ८ ते १२ फूट रुंदीचा पॅसेज, चार लिफ्ट आणि पाच जिन्यांची व्यवस्था, सार्वजनिक सुविधा केंद्र, बँक कार्यालये, दिव्यांग कक्ष, अभिलेख कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम यांसारख्या सुविधादेखील इमारतीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790