🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

चौथे विश्व मराठी संमेलन: विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि कार्यशाळांचे आयोजन

नाशिक। दि. २३ फेब्रुवारी २०२६: ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे दिनांक 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 या कालवाधीत म.वि.प्र. समाज संस्थेच्या के.टी.एच.एम कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.

27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता संमलेनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती तर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासान मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कॉर्पिओच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक, संशोधक, कलाकार, उद्योजक तसेच मराठीप्रेमी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत. नाशिक शहरातील साहित्यप्रेमी, वाचक व लोकप्रतिनिधींनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी व म.वि.प्र समाज संस्थेचे सरचिटणीस तथा स्वागताध्यक्ष विश्व मराठी संमेलन, नाशिक ॲड नितिन ठाकरे यांनी केले आहे.

मराठी विश्व संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण पुरस्काराने, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कराने तर शंतिब्रह्म, गुरूवर्य मारूती बाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : ‘डिजिटल पोलिस’ यंत्रणेचा प्रभाव; चार दिवसांत ३०५ वाहनचालकांवर ई-चलन कारवाई

या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन, नव्या पिढीत भाषेबाबत अभिमान निर्माण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर वाढविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा ठरविणे हे संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उन्हाळ्याची चाहूल; नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा ३४.३ अंशांवर

संमेलनादरम्यान विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि लोकपरंपरेचे वैभव या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. तसेच परदेशातील मराठी संस्थांशी संवाद साधून मराठीच्या डिजिटल भविष्यासंदर्भात आणि अनुवादाच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याबाबत विचारमंथन होणार आहे.

संमेलनाच्या आयोजनासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने व्यापक तयारी सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संमेलनामुळे नाशिक शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल तसेच सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790