नाशिक: द्वारका येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी

नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२६: नाशिक पूर्व विभागातील जुना देवळाली नाका (द्वारका) परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या अंतिम भूखंड क्रमांक २८२ वरील व्यावसायिक वापर आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने सुनावणी आयोजित केली आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथील उपायुक्त (अतिक्रमण) यांच्या कार्यालयात ही सुनावणी होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 21 नोव्हेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाने यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. या भूखंडावर सुमारे ७९ व्यावसायिकांकडून विविध व्यवसाय सुरू आहेत. महापालिकेच्या नोटिशीवर ४९ व्यावसायिकांनी आक्षेप नोंदविले असून, त्यांना आता सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चिमुकल्या स्पंदनची सामाजिक बांधिलकी; पिगी बँकेतील १,६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द

या सुनावणीदरम्यान संबंधित जागेवरील ताबा, मालकी हक्क आणि महापालिकेच्या मालमत्तेच्या हिताशी निगडित बाबींची तपासणी केली जाणार आहे. तसेच भूखंडासंदर्भातील विकास आराखड्यातील (डीपी प्लॅन) कागदपत्रेही प्रशासनाकडून सादर केली जाणार आहेत.

संबंधित व्यावसायिकांनी तसेच त्यांच्या वकिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुराव्यांसह सुनावणीला उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ २५ नोव्हेंबरला मॉक ड्रिल

दरम्यान, ४९ व्यावसायिकांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणीदरम्यान काय भूमिका मांडली जाते आणि महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे द्वारका परिसरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790