सुमारे 7 कोटी ८४ लाख रुपयांच्या दंडाची आकारणी
नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२६: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. मोबाइल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम (MTES – रडार यंत्रणा) या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्वयंचलितरीत्या कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
एप्रिल २०२६ ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३९ हजार २३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे 7 कोटी ८४ लाख रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, एचएसआरपी नंबर प्लेट नसणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणे अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांचा समावेश आहे. यासोबतच वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे, महामार्ग तसेच नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर रडार यंत्रणेसह सज्ज असलेल्या तीन रडार इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे वाहनचालकांचा वेग, हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट, वाहनांची नंबर प्लेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधून तात्काळ ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.
ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यापुरती मर्यादित नसून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुषंगाने प्रत्येक वाहनचालकाने वाहनाची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. ज्या वाहनांवर ई-चलन दंड प्रलंबित आहे, त्यांनी संबंधित दंडाची तात्काळ भरपाई करावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक व चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी कळविले आहे.
![]()


