नाशिक। दि. ११ जुलै २०२६: ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘हरित कुंभ – हरित मान्सून’ अर्थात ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवार, १२ जुलै रोजी नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर तब्बल ६ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ होणार असून, नंदिनी नदीला स्वच्छतेसोबत हरिततेची जोड देण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
नाशिक शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने प्रशासन आणि नाशिककरांच्या लोकसहभागातून ‘उन्नत नाशिक अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाला विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रातील संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याचाच पुढचा टप्पा म्हणून ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
या अभियानाचा शुभारंभ २८ जून रोजी सातपूर येथील देवराई परिसरात करण्यात आला होता. त्याच दिवशी शिंदे ग्रामपंचायत हद्दीतही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या रविवारी मसरूळ वनराई (पिकॉक गार्डन) आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी रिसॉर्ट परिसरात एकूण ६ हजार वृक्षांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला. आता या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण केले जाणार आहे.
यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान ६१ टनांहून अधिक कचरा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्याचबरोबर जेसीबी आणि पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. या कामातून सुमारे चार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला, त्यामुळे नदीची प्रवाहक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून सुमारे चार कोटी लिटर अतिरिक्त पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात नदीचा सुरळीत प्रवाह पाहून या कामांची परिणामकारकता नागरिकांनाही अनुभवता आली.
नदी स्वच्छतेनंतर आता नदीच्या संपूर्ण लांबीवर दोन्ही बाजूंनी देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून नंदिनी नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. स्वच्छता आणि वृक्षारोपण या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे.
या अभियानाचा मुख्य शुभारंभ रविवार, १२ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता पिंपळगाव बहुला येथील महादेव मंदिर, नंदिनी नदी परिसरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, पखाल रोड, मुंबई नाका येथून वृक्षारोपण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करण्यात येणार आहे. नंदिनी नदी स्वच्छता अभियानावेळी निश्चित करण्यात आलेल्या दहा ठिकाणी टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण केले जाणार आहे.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी मोठ्या संख्येने या वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, युवक संघटना, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी नाशिककरांना आवाहन करताना म्हटले आहे की, “नंदिनी नदी स्वच्छता अभियानाला नागरिकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची ताकद दाखवून देणारा होता. आता त्याच जनशक्तीच्या बळावर नंदिनी नदीच्या दुतर्फा वृक्षलागवड करून आपण हरित नाशिकचा संकल्प साकार करणार आहोत. वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संवर्धन करणेही आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन किमान एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून देशासमोर उभे करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल.”
नाशिकचे निसर्गवैभव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार गिरीश महाजन यांनी केले आहे.
![]()


