Amazon

नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; ३० तासांत १०७.३ मिमी पाऊस, झाडे कोसळली, जनजीवन विस्कळीत

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: नाशिक शहरात मागील ३० तासांत तब्बल १०७.३ मिमी पावसाची नोंद झाल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, चिखलाचे साम्राज्य, झाडे व फांद्या कोसळणे, तसेच काही ठिकाणी वाहने चिखलात अडकल्याच्या घटना घडल्या. मात्र प्रशासनाने पूर्वसूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने मोठी दुर्घटना टळली.

भारतीय हवामान विभागाने त्र्यंबकेश्वर परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री २.३० ते पहाटे ५.३० या तीन तासांत ६१.८ मिमी, त्यानंतर ५.३० ते सकाळी ८.३० या कालावधीत २१.८ मिमी, तर सकाळपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आणखी २३.७ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर रात्री पुन्हा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विद्यार्थ्यांना अडवून लुटणारा संशयित चेंबूरमधून जेरबंद; २४ तासांत गुन्ह्याचा छडा

गोदावरी आणि नंदिनी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दुतोंड्या मारुती मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी पोहोचले.

शहरभर झाडे कोसळली, वाहतुकीवर परिणाम:
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील २५ हून अधिक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर आणि वीजतारांवर पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी संपर्क करण्याचे आवाहन

रामवाडीतील आदर्शनगर, पखाल रोड, आयेशा नगर, हिरावाडी, पाथर्डीतील गजानननगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान परिसरासह विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. रामवाडीतील पुष्पक अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले.

अग्निशमन दलाकडे १८ आपत्कालीन कॉल:
अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने कारवाई करत रस्त्यांवरील झाडे आणि फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. गेल्या दोन दिवसांत अग्निशमन दलाकडे आपत्कालीन मदतीसाठी १८ कॉल प्राप्त झाले.

तळघरांमध्ये पाणी शिरले:
मुसळधार पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने काही इमारतींच्या तळघरांतही पाणी शिरले. बोधलेनगर बसस्टॉपजवळील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अग्निशमन दलाने पंपाच्या साहाय्याने पाणी बाहेर काढले. सोमेश्वर कॉलनीतही अशाच प्रकारची घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

प्रशासन सतर्क; शाळा, बाजारपेठा बंद:
हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या, तर अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमी राहिली आणि संभाव्य मोठ्या दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790