
नाशिक। दि. ४ मे २०२६: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी श्री काळाराम मंदिराला भेट देऊन पाहणी केली तसेच सुरक्षेचा आढावा घेतला.
श्री. काळाराम मंदिर येथे ध्वजस्तंभ उभारणे तसेच गोदावरी महाआरतीचा कार्यक्रम 6 मे, 2026 रोजी सायंकाळी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती श्री. कोविंद व मुख्यमंत्री श्री. फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महापौर हिमगौरी आडके-आहेर,
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी श्री काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,
वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, अपर तहसीलदार अमोल निकम, श्री काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीर पुजारी, श्री गंगा गोदावरी सेवा समितीचे पदाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांनी यावेळी सांगितले की, अतिमहत्वाच्या व्यक्ती दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षेचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात यावा. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी राजशिष्टाचारानुसार कुठलीही कमतरता भासू नये अथवा अडचण येवू नये याची दक्षता घ्यावी. तर महापौर श्रीमती आहेर यांनी अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौरा मार्गावरील स्वच्छता, अतिक्रमण आदीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यांनतर या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामकुंड परिसरासही भेट देऊन पाहणी केली.
![]()

