सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

नाशिक। दि. २ ऑगस्ट २०२६: सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरू असलेली सर्व पायाभूत विकासकामे निर्धारित मुदतीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करावीत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कामांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात आयोजित बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. मंत्री महाजन यांनी शहरातील रस्ते विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. एका बाजूचे काम पूर्ण होताच संबंधित रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा आणि उर्वरित कामे समांतरपणे सुरू ठेवावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यातही शक्य त्या ठिकाणी कामे सुरू ठेवावीत, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, साईडपट्ट्या पूर्ववत कराव्यात आणि काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत डीआरडीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू

कामांमुळे वाहतूक वळविण्यात आलेल्या पर्यायी मार्गांची नियमित देखभाल संबंधित कंत्राटदारांनी करावी. विशेषतः द्वारका सर्कल, काठे गल्ली, त्र्यंबक रोड, सातपूर तसेच इतर पर्यायी मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वाहतूक पोलिस, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे वाहतूक नियोजन प्रभावीपणे राबवावे, असेही त्यांनी नमूद केले.

रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा किंवा अनावश्यक विलंब कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत, करारातील अटींचे पालन न करणाऱ्या अथवा कामे वेळेत सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही यंत्रणा, डेटा सेंटर, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), सिव्हरेज, पूल, डीपी रस्ते, म्हाडा प्रकल्प आणि प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यातील सर्व प्रकल्पांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सिंहस्थ-२०२७ अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांचे सादरीकरण केले. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, सिव्हरेज, एसटीपी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा आणि आरोग्य सुविधांसह विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  रुग्णांसाठी मोठी बातमी! रविवारीही अपोलोमध्ये कन्सल्टेशन, डायग्नॉस्टिक्स आणि हेल्थ चेक !

त्यांनी सांगितले की, प्रमुख सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील एका बाजूची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून डीएलसीसीची कामे पूर्ण झालेल्या मार्गांवर अंतिम काँक्रीटीकरणाचा टप्पा सुरू होणार आहे. गंगापूर फाटा, अंबड, राजीव गांधी मार्ग, त्र्यंबक रोड आणि सातपूर परिसरातील भूमिगत सुविधा उभारण्याची कामे नियोजनानुसार सुरू असून ऑगस्टअखेरपर्यंत बहुतांश युटिलिटीची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

संत गाडगे महाराज पूल आणि त्र्यंबक रोड परिसरातील पुलांची कामे वेगाने सुरू असून नदीपात्रातील पायाभूत कामे पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिव्हेज पंपिंग स्टेशन आणि सिव्हरेज नेटवर्कची कामेही समाधानकारक प्रगतीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील प्रस्तावित ऑप्टिकल फायबर नेटवर्कपैकी सुमारे २६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम रस्ते प्रकल्पांशी समन्वय साधून सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून त्याद्वारे वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेवर प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवा निवृत्तीवेतनधारकांसाठी महा उपलब्धी मोबाईल ॲप- सहसंचालक बाबूलाल पाटील यांची माहिती

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळापत्रकानुसार प्रत्येक कामाचे नियमित निरीक्षण केले जात असून महानगरपालिका त्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आयुक्त मनिषा खत्री यांनी व्यक्त केला.

बैठकीस आमदार गोकुळ गिते, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी, स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790