नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२५: एका ८० वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला मनी लाँडरिंग प्रकरणात अडकवून ३० लाखांची फसवणूक करण्यात आली. व्हिडिओ कॉलवर सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट दाखवून १० दिवस घरातच राहण्यास भाग पाडले. या काळात वेळोवेळी आरटीजीएसद्वारे ३० लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले.
या सेवानिवृत्ताला १७ नोव्हेंबर रोजी सकाळी व्हॉट्सअॅप कॉल आला. आधारकार्डचा वापर करून मोबाइल सिम घेतल्याचे सांगितले. त्या नंबरवरून अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले जात असल्याचे भासवले. या नंबरचा वापर मनी लाँडरिंगमध्ये झाल्याचे सांगण्यात आले. सीबीआयमध्ये गुन्हा दाखल असल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. त्याने अटक वॉरंट असल्याचे सांगितले. मुंबईहून पथक अटक करण्यासाठी येत असल्याचे सांगून खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले.
चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ कॉल बंद करू नये, कुणालाही सांगू नये असे बजावले. पैसे ३६ तासांत परत मिळतील, असेही सांगण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या नावाने चौकशी सुरू असल्याचे सांगितल्याने आणि अटक वॉरंट दाखविल्याने त्यांनी १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान वेळोवेळी ३० लाख रुपये ट्रान्सफर केले. अटकेच्या भीतीने पैसे दिल्याचे त्यांनी सांगितले. सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशातील कोणतीही तपास यंत्रणा मोबाइलवर अटक वॉरंट पाठवत नाही. तात्काळ सायबर पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांनी केले आहे.
![]()
