नाशिक (प्रतिनिधी): महागडी नेक्सा कार बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून सदरची कार मिळविण्यासाठी या ना त्या कारणाने पैसे उकळून सायबर भामट्याने एका वयोवृद्धाला तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिमन्यु नामदेव माळी (६२, रा. जगन्नाथ चौक, मेट्रो झोन, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या व्हॉटसॲप क्रमांकांवर अज्ञात सायबर भामट्याने व्हॉटसॲप कॉल केला. संशयिताने माळी यांना नेक्सा कंपनीची महागडी कार बक्षिस लागल्याचे सांगितले.
वारंवार संपर्क साधून त्याने माळी यांचा विश्वास संपादन केला आणि कार मिळविण्यासाठी काही प्रक्रियेसाठी पैसे ऑनलाईन भरण्यास भाग पाडले.
त्यानुसार माळी यांनी सायबर भामटच्या ८२७२९८८०६८ या व्हॉटसॲप क्रमांकावर, ७९८०९७८७२६ या फोन पे क्रमांकावर यासह आणखी चार मोबाईल क्रमांकावर मागणीप्रमाणे पैसे भरत गेले.
परंतु २ लाख ५५ हजार ४६२ रुपये भरूनही संशयितांकडून पैशांची मागणी केली. सदरचा प्रकार १८ मे ते २६ मे २०२३ यादरम्यान झाला आहे.
याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.