नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): काल म्हणजेच मंगळवारी (दि. २३ जानेवारी) रासबिहारी लिंक रोड येथे एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. दुसऱ्याबरोबर मोबाईलवरून चॅटिंग करीत असल्याचा राग येऊन संतप्त प्रियकराने तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याचं समोर आलंय.
त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून चारचाकीतून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला. मंगळवारी (ता. २३) सकाळी प्रियंका विरजी वसावे (वय १९, मु. पाटबारा, पो. जमाना, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या सहा तासांत संशयित प्रियकरास शिताफीने बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर तडवी (२१, मूळ रा. नंदुरबार, हल्ली राहणार, माऊलीनगर, अंबड, नाशिक) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका परिचारिका महाविद्यालयात परिचारिकेचे शिक्षण घेत होती.
प्रियंका व सागर यांची जुनी मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. सोमवारी दुपारी प्रियंका अंबड येथे राहत असलेल्या सागरच्या घरी सायंकाळी गेली होती.
रात्री एक ते दीडच्या सुमारास प्रियंका दुसऱ्या कोणाशी मोबाईल फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. यात संतप्त झालेल्या सागरने प्रियंकाचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.
यानंतर भानावर आलेल्या सागरने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह चारचाकीतून उड्डाणपूलमार्गे बळी मंदिर येथून रासबिहारी लिंक रोडवरील मिरद्वार लॉन्सशेजारी मोकळ्या जागेत फेकून दिला.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास येथून जाणाऱ्या एका नागरिकास युवती मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लागलीच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथके रवाना करण्यात आली.
हवालदार कैलास शिंदे व पोलिस नाईक संदीप मालसाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून ते संशयित सागर तडवी याच्या अंबड येथील घरी पोहोचले.
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी बजावली कामगिरी:
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, रोहित केदार, हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे, अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलिस नाईक नीलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्याम महाले, वैभव परदेशी, नितीन पवार, गोरख साबळे, श्रीकांत साळवे यांनी संयुक्तिकरीत्या केली.