नाशिक (प्रतिनिधी): सिग्नल नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकीचालकाने कारसमोर दुचाकी उभी केली. त्याला ‘सिग्नल बघ’ या बोलण्याचा राग आल्याने संशयिताने कारमधील महिलेला शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गंजमाळ सिग्नलवर घडला. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित दुचाकीचालक समीर शहा (वय: ३०, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि. २४) दुपारी ३ वाजता मुलगी, जावई व मुलगा असे इन्होवा कारने पंचवटीकडून त्यांच्या राहत्या घरी जात असताना खडकाळी सिग्नल पास करत असतानाच दूध बाजारकडून दुचाकीने येत दुचाकीस्वाराने सिग्नल तोडून गाडी पुढे आणली. महिलेच्या जावयाने संशयिताला सिग्नल बघ असे म्हटले असता याचा राग आल्याने दुचाकी कारसमोर उभी करून त्याने रस्ता अडवला.
दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत महिलेच्या जावयाला मारहाण केली. महिला समजावून सांगत असताना संशयिताने महिलेच्या अंगावरील कपडे पकडून ओढाताण करत लाथ मारत विनयभंग करत शिवीगाळ केली. भद्रकाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत संशयिताला ताब्यात घेतले. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११९/२०२५)