नाशिक। दि. १६ सप्टेंबर २०२६: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने वृद्ध आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील हनुमाननगर येथे घडली. कमलाबाई अनाजी वळवी (वय ८०) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा मुलगा तानाजी अनाजी वळवी (वय ४१) याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेप्रकरणी मृत महिलेची मुलगी हिराबाई गावित (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमाननगर-ध्रुवनगर परिसरात वळवी कुटुंब वास्तव्यास आहे. तानाजी हा आई, पत्नी आणि तीन मुलांसह राहत होता. तो अधूनमधून कंपनीत मोलमजुरीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर पत्नीशी वाद घालणे आणि तिला मारहाण करणे, असा प्रकार वारंवार घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वेळी कमलाबाई या मुलगा आणि सुनेतील वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप करीत असत.
सोमवारी (दि. १४) रात्रीही तानाजीचा पत्नीसोबत वाद झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर त्याची पत्नी निशा वळवी घराबाहेर निघून गेली. त्यानंतर तानाजीने आई कमलाबाई यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तानाजीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी झाल्याने कमलाबाई रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या.
घटनेनंतर तानाजीने काही नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने सुरुवातीला त्याच्या सांगण्यावर नातेवाईकांचा विश्वास बसला नाही. त्यानंतर कमलाबाई यांची नात आणि नातू यांनी घरी धाव घेतली. कमलाबाई गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी रात्री सुमारे ११ वाजता त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच संशयित तानाजी वळवी याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
![]()


