नाशिक। दि. ९ ऑक्टोबर २०२५ : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातपूरमधील नाइस संकुलातील एका पबमध्ये शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे तसेच त्यांचा मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि. ८) रात्री सातपूर पोलिस ठाण्यात त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
या घटनेची गंभीर दखल घेत शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासात गती आणली. प्राथमिक तपासात लोंढे टोळीने संगनमताने पूर्वनियोजित कट रचून गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आयुक्त कर्णिक यांनी पोलिस उपायुक्त किशोर काळे यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
या कारवाईअंतर्गत लोंढे पिता-पुत्रांसह त्यांचे साथीदार संतोष पवार आणि अमोल पगारे यांनाही सहआरोपी करत पोलिसांनी अटक केली असून, चौघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे व इतर काही साथीदार फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके सक्रिय आहेत.
![]()
