नाशिक। दि. ८ ऑक्टोबर २०२५: आईच्या वृद्धपणाला कंटाळून मुलाने तिचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार नाशिकरोड येथे मंगळवारी (दि. ७) रात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी माहिती दिली की, जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील ८५ वर्षांच्या यशोदाबाई मुरलीधर पाटील या आजारी होत्या. त्यांचा मुलगा अरविंद मुरलीधर पाटील (५८, रा. शिवाजीनगर, जेलरोड, नाशिकरोड) हा त्यांच्या वृद्धपणाला आणि त्यामुळे येत असलेल्या आजारपणाला कंटाळला होता. या पोटच्या मुलाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजता आई झोपली असताना तिचा गळा दाबून तिला संपविल्याची कबुली स्वतः पोलिस ठाण्यात येऊन दिली.
त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी तपास करुन त्याला तत्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील नागरिकांमध्ये वृद्ध यशोदाबाईंबद्दल हळहळ व्यक्त होत असून त्यांना मारणाऱ्या मुलाबद्दल प्रचंड चिड आणि संताप व्यक्त होत आहे.
मी आईला मारुन टाकले:
‘मी आईच्या वृद्धापणाला खूप कंटाळलो होतो. यामुळे खूप त्रास होत असल्याने अखेरीस तिचा गळा दाबून मी तीचा आज खून केला आहे, मला अटक करा’. असे सांगत यशोदाबाईंना मारणारा त्यांचा मुलगा अरविंद स्वतःच पोलिसांत हजर झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरामध्ये प्रवेश करत पाहणी केली असता पलंगावर यशोदाबाई या निपचित पडलेल्या होत्या. पोलिसांनी लागलीच आजूबाजूच्या रहिवाशांकडे विचारपूस केली व बाळू विरोधात गुन्हा दाखल केला.
![]()
