नाशिक। दि. ६ नोव्हेंबर २०२५: सोने तारण ठेवून त्या मोबदल्यात आठ लाखांचे कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्थेकडून कर्जाचा हप्ता महाग पडत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तारण ठेवलेले सोने काढून घेत दुसऱ्या एका फायनान्स कंपनीकडे तारण ठेवत असल्याचे भासवत कर्जाची रक्कम काढून घेत सोने तारण न ठेवता फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयित राकेश गाडे व उषा गाडे (रा. तिरुमला ओमकार रेसिडेन्सी, पाइपलाइनरोड) या दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व आयआयएफएल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित गाडे दाम्पत्याने कॅपप्री ग्लोबल कॅपिटलमध्ये तारण ठेवलेले सोने काढून घेत आयआयएफएल फायनान्स ठेवणार होते.
त्या बदल्यात त्यांना ७ लाख ७१ हजार रुपये आधीच्या वित्तीय संस्थेत भरण्यासाठी वर्ग केली. मात्र, संशयितांनी सोने तारण कर्जावरील रक्कम आधीच्या संस्थेत जमा न करता दुसऱ्या खात्यावर वर्ग केली. त्यामुळे सोने तारण कर्ज घेतले पण तारण ठेवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत गाडे यांच्याशी कंपनीकडून वारंवार संपर्क करूनही गाडे यांनी दाद न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७९८/२०२५)
![]()


