
नाशिक। दि. ३ डिसेंबर २०२५: फ्लॅटधारकांचे फ्लॅट परस्पर तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून त्यांना खरेदी खत न देता फ्लॅटचा मालकी हक्क स्वतःजवळ राखून ठेवत तक्रारदार सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांच्यासह अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (दि. ३) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संसरी गावातील हरि निकेतन (फेज-२) गृह प्रकल्पामधील फ्लॅटधारकांनी संपूर्ण रक्कम कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक व बांधकाम व्यावसायिक संशयित नरेश कारडा यांच्याकडे अदा केली होती; मात्र फ्लॅटधारकांना त्यांनी अद्याप खरेदीखत तयार करून दिले नाही. दरम्यान. कॅप्रीग्लोबल नावाच्या फायनान्स कंपनीच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करत फ्लॅट तारण ठेवून सुमारे २३ कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र त्याची परतफेड न केल्यामुळे कंपनीने त्या फ्लॅटचा जाहीर लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करणार असल्याच्या नोटिसा फ्लॅटधारकांना देण्यात आल्या होत्या.
यामध्ये तक्रारदार सेवानिवृत्त कर्नल यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून कारडा व कॅप्रीग्लोबल या आर्थिक संस्था यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २) फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने रात्री कारडा यांना ताब्यात घेत अटक केली होती. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल करत आहेत.
![]()
